। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाण्याच्या सीपी तलाव परिसरात कचरा टाकण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे कचराकोंडी झालेल्या ठाणे महापालिकेने शहरात गोळा होणारा कचरा सध्या भिवंडीच्या आतकोली येथे टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ठाणेकरांचा कचरा आमच्या दारात नको, असा आवाज उठवत भिवंडीकरांनी डम्पिंगला विरोध केला आहे. ठाण्यापाठोपाठ भिवंडीतही कचरा पेटल्याने पडघ्याच्या आतकोलीतील 85 एकर जागेवरील डम्पिंग वादाच्या भोवर्यात अडकला आहे.
ठाणे महानगरपालिका हद्दीत दररोज अंदाजे 1 हजारांहून अधिक कचर्याची निर्मिती होते. हा संपूर्ण कचरा डंपरमार्फत आतकोली क्षेपणभूमी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेला जातो. अख्ख्या ठाणे शहराचा कचरा भिवंडीतील आतकोली गावाच्या हद्दीत डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला जात असल्याने स्थानिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. या डम्पिंग ग्राऊंडवरविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी एकजूट दाखवली आहे. दरम्यान, भविष्यात कचर्याच्या समस्यांमुळे डोकेदुखी वाढणार असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. स्थानिकांना विचारात न घेता राज्य सरकारने ही जागा दिली आहे. या जागेवर दररोज 100 हून अधिक कचर्याचे डंपर रिकामे केले जात असल्याने दुर्गंधी वाढली आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा श्वास कोंडला जात असल्याने येत्या सोमवारी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिली आहे.