| सोगाव | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील सर्वात जास्त प्रमाणात रहदारीचा व वाहनांची सतत वर्दळीच्या असलेल्या अलिबाग रेवस मार्गावर बुधवारी (दि.2) रोजी दुपारच्या वेळी दुचाकी व चारचाकी वाहनामध्ये अपघात होऊन दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारच्या वेळी दुचाकी चालक अलिबाग -रेवस मार्गावरून अलिबाग बाजूकडून रेवस बाजूकडे जात असताना रेवस बाजूकडून अलिबागकडे येणाऱ्या चारचाकी या वाहनामध्ये थळ ग्रामपंचायत हद्दीतील वायशेत जवळ भररस्त्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक केतन भगत (35), रा. झिराड हा गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत असलेल्या दुचाकी चालकाला स्थानिक वाहनचालक व नागरिकांनी अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकावर प्राथमिक उपचार करून त्यास पुढील अधिक उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास अलिबाग पोलीस करीत आहेत.