। ठाणे । प्रतिनिधी ।
गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी मोठा गाजावाजा करून आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, शहापुरात या योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून तब्बल 1 लाखहून अधिक नोंदण्या रखडल्या आहेत. त्यामुळे कार्डच नसल्याने रुग्णांना नाईलाजस्तव महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत. आरोग्य विभागातील अधिकार्यांच्या गोंधळी कारभारामुळे हा फटका बसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत विविध खासगी रुग्णालयात 1 हजार 356 आजारांवर मोफत उपचार करण्यात येत असतात. परंतु, त्याबाबत ग्रामीण भागात अधिक माहितीच नसल्याने ते खासगी दवाखान्यात महागडे उपचार घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहापूर तालुक्यात आतापर्यंत 3 लाख 67 हजार 658 नागरिकांपैकी फक्त 1 लाख 48 हजार 871 आयुष्मान कार्ड काढल्याचे समोर आले आहेत. तर 1 लाख 28 हजार 832 नागरिकांची तांत्रिक अडचणीमुळे केवायसी पूर्ण न झाल्याने ते रखडले आहेत. तसेच, 89 हजार 955 नागरिकांनी अद्यापही नोंद न केल्याने या कार्डपासून वंचित आसल्याची माहिती समारे येत आहे.