। कल्याण । प्रतिनिधी ।
कल्याण-डोंबिवली मनपाची शाळा क्र. 54 मोहीली येथील जुनी शाळा पाडल्याने मनपाच्या पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून खाजगी घरात एकत्र शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.
मनपा क्षेत्रातील मनपा शाळांना हायटेक लुक देत स्मार्ट शाळांकडे वाटचाल करण्यासाठी आयुक्त अंमलबजावणी करीत आहेत. परंतु, शिक्षण विभागाचा ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभार आणि समन्वयाअभावी दोन महिन्यांपासून मनपा शाळा क्र. 54 मधील पहिली ते पाचवीचे विद्यार्थी शाळेअभावी मोहीली गावातील खाजगी घरात एकत्र शालेय धडे गिरवत असल्याने मनपा शिक्षण विभागाचे पुरते वाभाडे निघाले असल्याचे दिसत आहे. गावातील महिलांनी या प्रश्नी कल्याण डोंबिवली मनपा मुख्यालयाकडे धाव घेतली, पंरतु त्यांना प्रवेशद्वाराजवळच रोखण्यात आले. शाळा बांधण्याचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल असे अधिकार्यांनी त्यांना सांगितले. परंतु उपस्थित महिलांनी नवीन शाळा बांधण्याचे काम प्रलंबित असल्याचे ठणकावून सांगितले. तर सुट्टीच्या काळात शाळेचे काम पूर्ण होईल असे मोघम उत्तर देत महिलांची बोळवण केल्याचे दिसले.