। छ. संभजीनगर । प्रतिनिधी ।
ग्रामीण भागात चिंच व्यवसायाला प्रारंभ झाला आहे. दरवर्षी फेब्रुवारी ते मे या 4 महिन्यांदरम्यान येणार्या हंगामात यंदा मात्र चांगला दर मिळत आहे. मोठे व्यापारी हा तयार माल खरेदी करून शहरात 7 ते 8 हजार रुपये क्विंटलप्रमाणे विक्री करत आहेत. पैठणच्या खेड्यापाड्यातील हातांना आंबट चिंचांच्या व्यवसायातून रोजंदारीचा गोडवा प्राप्त झाला असून, ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.
पैठण तालुक्यातील बहुतांश गावांत चिंच वृक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत. विशेषतः गोदावरी नदीकाठासह बालानगर, पाचोड आडुळ, चितेगाव, बिडकीन, ढोरकीन, विहामांडवा व लोहगाव येथे चिंचेची जुनी महाकाय झाडे आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चिंच व्यवसायाला सुरुवात झाली. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की हातावर पोट असलेल्यांना चिंच फोडणीचे काम मिळते. त्यातून संसाराचा गाडा हाकण्यासाठी आर्थिक आधार मिळत आहे. चिंच फोडणीसाठी प्रतिकिलो 8 ते 10 रुपये अशी मजुरी दिली जात आहे. सध्या बाजारात 3 ते 7 हजार रुपये क्विंटलने चिंचेची खरेदी केली जात आहे. तसेच, ग्रामीण भागातील महिलांना चिंच फोडणीतून दिवसभरात 400 रुपयांची कमाई होत आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत असल्याने चिंच झोडणीचे कामही जोरात सुरू आहे. यंदा भाव बर्यापैकी मिळत असल्याने आंबट चिंच खरेदीदार मजूर व उत्पादकांनाही गोड ठरली आहे.
दोन महिने रोजगार
फेब्रुवारीपासून चिंचा फोडण्याची कामे सुरू झाली आहेत. मे महिन्यापर्यंत ग्रामीण भागात ही रोजगार निर्मिती कायम राहणार आहे. झाडावर चढून बांबूच्या काठीने झोडपून चिंचा खाली पाडण्यासाठी तसेच जमिनीवर पडलेल्या चिंचा वेचणे, टरफल बाजूला करणे, चिंचा फोडून गर व चिंचोके वेगळे करणे यासाठी तरुण मजुरांची संख्या जास्त आहे. चिंचा झोडपण्यासाठी 500 रुपये रोज मिळत आहे. चिंचा वेचणार्या महिलांना 250 रुपये मजुरी मिळत असून टरफल बाजूला केल्यानंतर चिंचा फोडल्या जातात. ग्रामीण भागातील अनेक महिला घरातील कामे करीत चिंच फोडणी करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात.