ग्रामपंचायत कर्मचार्यांचा प्रताप, नागरिकांकडून नाराजी
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावातील ग्रामस्थांचे सकाळी आणि संध्याकाळी मनोरंजनाचे ठिकाण म्हणून राजमाता जिजामाता तलाव ओळखला जातो. या तलाव परिसरात नेरळ गावातील ज्येष्ठ, वयोवृद्ध आणि महिला या चालण्यासाठी गर्दी करून असतात. मात्र, याच तलाव परिसरात दररोज कचरा जाळण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी त्या ठिकाणी झाडांच्या फांद्या आणि पालापाचोळा असा सर्व कचरा तेथेच जाळतात आणि सतत त्या ठिकाणी धुराचे लोट दिसून येतात, त्यामुळे प्रदूषणमुक्त वातावरण बिघडण्याचे काम ग्रामपंचायत कर्मचारी करताना दिसत आहेत. त्याबद्दल काही ज्येष्ठ नाराजी व्यक्त करीत आहेत.
1999 मध्ये नेरळ ग्रामपंचायतीने राजमाता जिजामाता भोसले तलावाची निर्मिती केली. त्यानंतर तेथे पाण्यामध्ये बोटिंगदेखील सुरु केले आणि त्यानंतर जिजामाता तलाव नेरळ ग्रामपंचायतीमधील रहिवासी आणि आसपासच्या गावकर्यांचे मनोरंजनाचे ठिकाण बनले गेले आहे. त्यांनतर तीर्थरूप, ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्याकडून जिजामाता तलावाचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेतला आणि 2017 मध्ये नेरळ ग्रामपंचायतीचे तलाव आणखी आकर्षक बनले. या तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे असून, त्या झाडांचा पालापाचोळा पाण्यात पडून पाणी दूषित होत होते. त्यावेळी तलावाच्या जलाशयाजवळ असलेली झाडे ही काही प्रमाणात तोडण्यात आली.पण, झाडांच्या छायेत राजमाता जिजामाता तलाव उभा आहे. सातत्याने त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात वृक्षारोपणदेखील केले जात असते.
सर्वत्र कचरा जाळण्यास बंदी असून, गोळा करण्यात आलेला कचरा हा प्रक्रिया करण्यासाठी घकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे पाठवण्यात यावा, अशी रचना आहे. नेरळ ग्रामपंचायतीमध्ये झाडाचा पालापाचोळा हा कुठेही घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे पाठविला जात नाही. जवळच्या माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेमध्ये झाडांच्या पालापाचोळ्यावर प्रक्रिया करून तेथे वीजनिर्मिती केली जाते. मग नेरळ गावातील ग्रामपंचायत कर्मचारी पळवाट काढून कचरा जाळण्याचे काम करीत असल्याचे दररोज दिसून येत असते. नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांचे नियंत्रण या सर्व प्रक्रियेवर आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यशस्वी करण्यासाठी विशेष लक्ष असायला हवे. मात्र, ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून कोणतेही नियंत्रण ग्रामपंचायत आणि कर्मचार्यांवर नाही असे दिसून येत असल्याचा आरोप केला जात असून, तलाव परिसरात कचरा जाळला जात असल्याबद्दल बोलत आहेत.
दररोज टाळावा परिसरात पडलेला कचरा पालापाचोळा एकत्र करतात आणि एखाद्या झाडाखाली कचरा पेटवला जातो. काही वेळी तर मोठ्या झाडणाच्या मुळाशी कचरा जाळण्याचे प्रकार झाले असल्याने त्यावेळी एका झाडाला आपले आयुष्य संपवावे लागले आहे. काल परवा आणखी एक झाड हे हे जळत असून, त्या झाडाच्या तळाशीदेखील असाच कचरा जाळण्यात आल्याने ते झाड जाळून जात आहे. तर सतत कचरा जाळला जात असल्याने तलाव परिसरात झाडांना धोका निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. याबद्दल नेरळ ग्रामपंचायत प्रशासन गांभीयाने लक्ष देईल काय, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिक विचारत आहेत.