नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
| धाटाव | वार्ताहर |
रोहा तालुक्यात असलेल्या वरसे ग्रामपंचायतीमध्ये कचर्याचा प्रश्न गंभीर बनला असून, डम्पिंग ग्राऊंडअभावी नागरिक घरातील कचरा इतरत्र टाकताना दिसत आहेत. यामुळे जनतेच्या आरोग्य धोक्याचे येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वरसेतील नागरिक कचरा कुठेही टाकत आहेत. दत्ताचा माळा या ग्राऊंड परिसरालगत असलेल्या नाल्यात नागरिकांनी कचरा टाकून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. वरसे ग्रामपंचायतीमध्ये गेल्या तीन ते चार महिन्यांपासून डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला अद्याप जागेचा तिढा सोडविता आला नसल्याने दिवसेंदिवस कचरा प्रश्न जटिल बनला आहे. वरसे ग्रामपंचायतीमध्ये तसे पाहता नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. येथील लोकसंख्या जवळपास दहा हजारांच्या वर आहे. अनेक इमारती उभे राहात असताना मात्र ग्रामपंचायत कचर्याचा प्रश्न सोडविण्यात हतबल झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे आगामी काळात वरसेतील स्थानिक नेते व ग्रामपंचायत डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न सोडविण्यात यशस्वी होतील का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तर, नागरिकांनी कचर्यासंदर्भात ग्रामपंचायतीला सहकार्य करणे गरजेचे आहे. कचरा रस्त्यावर न टाकता योग्य ठिकाणी टाकावा, असे बोलले जात आहे.
नागरिकांची गैरसोय होते याची आम्हाला कल्पना असून, येत्या सात ते आठ दिवसात जागेचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल.
अशोक गुट्टे
ग्रामसेवक
गेली अनेक वर्षे सत्तेत असणार्यांना ग्रामपंचायतीमध्ये साधा डंपिंग ग्राऊंडसाठी जागा उपलब्ध करता आली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
निलेश धुमाळ
भाजप शहराध्यक्ष, युवा मोर्चा