जेएनपीएच्या गटारात कचर्‍याचे साम्राज्य

स्वच्छ भारत अभियानाचा उडाला बोजवारा

। उरण । वार्ताहर ।

जेएनपीए प्रकल्पग्रस्त असणार्‍या सोनारी, करल गावांच्या वेशीवरील जेएनपीएने निर्माण केलेल्या नैसर्गिक पाणी निचरा होणार्‍या गटारात कचर्‍याचे साम्राज्य दिसून येत आहे. यामुळे संपूर्ण गटार तुंबल्याने स्वछतेचा बोजबारा निर्माण झाला आहे. यामुळे मच्छर, उंदीर, घुशीचा वावर वाढला असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

जेएनपीए परिसरात प्रकल्पग्रस्त असणारी सोनारी, करळ ही गावे जेएनपीए-पनवेल, नवीमुंबईकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याला येत आहेत. गावातील पाणी निचरा होण्यासाठी जेएनपीएच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून मुख्य गटाराची निर्मिती करण्यात आली होती. या गटाराच्या बाजूला हॉटेल तसेच अनेक खाद्य पदार्थांची व दारूची दुकाने आहेत. या दुकानांच्या लगत करल फाटा हा सर्वात मोठा रहदारीचा भाग असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी उभे असतात. मात्र, या गटारात खाद्य पदार्थांचा कचरा तसेच बाटल्याचा खच निर्माण झाला असून मच्छरांचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे. तसेच, या ठिकाणी मोठी दुर्गंधी पसरत असल्याने स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Exit mobile version