दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
| कोलाड | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील आंबेवाडी (कोलाड) येथील आठवडा बाजार परिसरात बेशिस्तपणे कचरा टाकण्यात आल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी निर्माण झाली असून नागरिकांना नाक मुठीत धरून बाजारात खरेदी करावी लागत आहे. या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, आंबेवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील आंबेवाडी नाका हे परिसरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे वर्षभर दर रविवारी आठवडा बाजार भरतो. या बाजारात भाजीपाला, कांदे-बटाटे, ओली व सुकी मच्छी, कपडे, चप्पल तसेच विविध वस्तूंच्या खरेदीसाठी परिसरातील सुमारे 70 ते 72 वाड्या-वस्त्या आणि खेडेगावांमधील नागरिक मोठ्या संख्येने येतात.
मात्र, बाजारालगत असलेल्या कालव्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. विशेषतः भाजीपाला व मच्छी विक्रीच्या भागात कचऱ्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत असून, बाजारातील व्यावसायिकांच्या व्यवसायावरही त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.
या परिसरात वाढती वस्ती असून, कालव्यालगत एम.पी.एस.एस. इंग्लिश मीडियम स्कूल असल्याने या मार्गावरून विद्यार्थ्यांसह असंख्य नागरिकांची दररोज ये-जा असते. त्यामुळे कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधी व अस्वच्छतेचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने कचरा साचलेल्या ठिकाणी पाणी साचून परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. आंबेवाडी ग्रामपंचायत तसेच प्रशासनाने लक्ष देऊन या कचऱ्याची निर्जन ठिकाणी विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.






