| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स (आरसीएफ) लिमिटेड, थळतर्फे निगमित सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत कारखाना परिसरातील आठ ग्रामपंचायतींना दहा घंटागाड्या बुधवारी (दि.17) शेतकरी प्रशिक्षण केंद्र, आरसीएफ थळ येथे कार्यकारी संचालक सुनील ठोकळ यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरीत करण्यात आल्या.
कारखाना परिसरातील गावांमध्ये स्वच्छता आणि आरोग्य उत्तम राहावे यादृष्टीने आरसीएफ तर्फे सीएसआरच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून कारखाना परिसरातील गावांना सुयोग्य रीतीने कचरा संकलनासाठी घंटागाड्या देण्यात येतात. यावर्षी सातीर्जे, आगरसुरे, सासवणे, परहुर, मापगाव, वरसोली, वेश्वी आणि ढवर या ग्रामपंचायतींकडून सीएसआर अंतर्गत घंटागाड्या देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार वरील आठ ग्रामपंचायतींसाठी दहा घंटागाड्या खरेदी करून त्या संबंधित ग्रामपंचायतींना सुपूर्त करण्यात आल्या. घंटागाड्या कार्यरत ठेवताना ग्रामपंचायतींना वाढत्या इंधन दराचा भार येऊ नये दृष्टीने आरसीएफ तर्फे यावर्षी बॅटरीवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही गाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत.
वितरण समारंभ प्रसंगी कार्यकारी संचालक सुनील ठोकळ यांनी पर्यावरण संतुलनात कचरा व्यवस्थापनाचे महत्व विशद करून ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्याचे आवाहन केले. तसेच यापुढे सीएसआरच्या माध्यमातून कारखाना परिसरात लोकोपोयोगी उपक्रम राबविले जातील याची ग्वाही दिली. यावेळी आरसीएफचे कार्यकारी संचालक-प्रचालन सुनील ठोकळ, मुख्य महाव्यवस्थापक शशिकांत उखळकर, महाव्यवस्थापक ज्योति पाटील, उपमहाव्यवस्थापक सर्वश्री अनुपम सोनावणे, सुधीर कोळी, मुख्य व्यवस्थापक हेमंत गुरसाळे, वरिष्ठ व्यवस्थापक सर्वश्री पंकज पाटील, भालचंद्र देशपांडे, महेश पाटील, जनसंपर्क अधिकारी संतोष वझे यांनी वाहन पूजन करून संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंचांकडे चाव्या व कागदपत्रे हस्तांतरित केली. याप्रसंगी सातीर्जे, आगरसुरे, सासवणे, परहुर, मापगाव, वरसोली, वेश्वी आणि ढवर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.