राधाकृष्ण मंदिर परिसरात कर्जत नपातर्फे उद्यान

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या तीरावर शनी मंदिर परिसरात राधाकृष्ण मंदिर ते शनी मंदिराच्या मागील बाजूस पालिकेकडून उद्यान आणि संरक्षण भिंती तसेच गणेश घाट बांधला जात आहे. मात्र त्या बांधकामास उल्हास नदी निर्मल जल अभियानाकडून आक्षेप नोंदविण्यात आला आहे. नदीमध्ये कोणत्याही प्रकारची बांधकामे होऊ नयेत अशी भूमिका या अभियानाची असून जलसंपदा विभागाने देखील पालिकेला सदर बांधकाम आपल्या खात्याची परवानगी न घेता असल्याने थांबवण्यात यावे अशी सूचना लेखी पत्रातून केली आहे.

कर्जत शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या उल्हास नदीला लागलेले प्रदूषणाचे ग्रहण दूर करण्यासाठी गेली चार वर्षे उल्हास नदी निर्मल जल अभियानकडून उल्हास नदी संवर्धनाचे काम केले जात आहे. नदीच्या आजूबाजूला स्वच्छता राखून निसर्ग फुलविण्याचे काम उल्हास नदी निर्मल जल अभियानकडून सुरू आहे. मात्र कर्जत नगरपरिषद कडून उल्हासनदीचे तीरावर नागरिकांच्या विरंर्गुळ्यासाठी गार्डन विकसित केले जात आहे. नदीच्या तीरावरील राधाकृष्ण मंदिर ते शनी मंदिरच मागची बाजू या भागात नदीच्या बाजूला संरक्षण भिंत आणि गार्डन तसेच श्री गणेश विसर्जन घाट बांधला जात आहे. या कामासाठी 50लाखाचा निधी राज्य सरकार कडून प्राप्त झाला असून सध्या शनी मंदिर परिसरात त्या बांधकामास सुरू झाली आहे. उल्हास नदीमध्ये शनी मंदिर ते आमराई या परिसरात नदीच्या कडेने इमारती उभ्या असून त्या इमारतीमधील सांडपाणी अनेक वर्षे नदीत सोडले जात आहे. ती बांधकाम उल्हास नदीचे प्रदूषण वाढविण्यास महत्वाचा भाग बनली आहेत. त्यामुळे पुन्हा नवीन बांधकामे केली जाऊ नयेत अशी भूमिका कर्जतकरांची आहे.त्यामुळे संरक्षण भिंत बांधकाम सुरू असताना या कामाला उल्हास नदी निर्मल जल अभियानकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

उल्हास नदी निर्मल जल अभियानाचे कार्यकर्ते समीर सोहनी यांनी कर्जत जलसंपदा विभागाला पत्र देवून ते बांधकाम करण्यास कशा प्रकारे परवानगी दिली आहे यांची विचारणा केली. त्यावेळी जलसंपदा विभागाच्या उपविभागीय कार्यालयाने उपअभियंता भ. रा. गुंटूरकर यांनी त्याबाबत कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना पत्र लिहून नदीचे पूर नियंत्रण रेषेच्या आत बांधकाम केले जात आहे. ते बांधकाम कोणतीही परवानगी न घेता सुरू आहे.त्यामुळे सदरचे बांधकामामुळे पूर येण्याची शक्यता वाढली आहे. ते लक्षात घेवून सदरचे बांधकाम तत्काळ दूर करण्यात यावे असे स्पष्ट आदेश पत्रातून दिले आहे.शहरातील वित्तहानी होऊ शकेल असे बांधकाम करताना जलसंपदा विभागाची परवानगी घेणं आवश्यक असून ती परवानगी घ्यावी आणि तसे अवगत करून बांधकाम सुरू करावे. परंतु सध्या केलेले बांधकाम हे उल्हास नदीच्या पूर नियंत्रण रेषेमध्ये असल्याने पालिकेने ते बांधकाम त्वरित दूर करावे अशी सूचना जलसंपदा विभागाने केली आहे.

पालिकेकडे उल्हास नदी अभियान कडून कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. मात्र जलसंपदा विभागाचे पत्र मिळाले असून त्याबाबत पालिका मुख्याधिकारी यांचेशी चर्चा करण्यात येणार आहे. मात्र मुख्याधिकारी हे रजेवर असल्याने जलसंपदा विभागाच्या पत्रावर आम्ही पालिकेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

मनीष गायकवाड, नगरअभियंता

उल्हास नदीचे संवर्धन व्हावे असून शहरातील प्रत्येक नागरिक प्रयत्न करीत आहे. त्यावेळी असे बांधकाम झाले तर पुन्हा पुराची भीती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे आम्ही विरोध केला आहे.

समीर सोहनी, निर्मलजल अभियान कार्यकर्ते
Exit mobile version