अलिबागच्या आयान पाटीलची गरुडझेप

अवघ्या 5व्या वर्षी देशात प्रथम; रायगडसह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

| अलिबाग | प्रतिनिधी |

राष्ट्रीय स्तरावर ‌‘इंडियन नॅशनल एरोस्पेस अँड कॅनसॅट चॅलेंज‌’च्या पहिल्या टप्प्यातील अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी संपूर्ण भारतातून सुमारे 7,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी चौथी ते बारावी इयत्तेतील होते. तरीदेखील या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील पाच वर्षीय आयान पाटील याने सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने 86.67 टक्के गुण मिळवून दुसऱ्या टप्प्यासाठी पात्रता मिळवत रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

राष्ट्रीय स्तरावरील ‌‘इंडियन नॅशनल एरोस्पेस अँड कॅनसॅट चॅलेंज‌’च्या पहिल्या टप्प्यातील अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थी किमान चौथी इयत्तेत शिकणारा असावा, हा प्रमुख निकष होता. मात्र अंतराळ विज्ञान, रॉकेट सायन्स आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील आयानची लहान वयातील जिज्ञासा, त्याचे ज्ञान आणि आजवरची उल्लेखनीय वाटचाल पाहून निवड समितीने त्याला अवघ्या पाचव्या वर्षी ही परीक्षा देण्यासाठी विशेष पात्र ठरवले. या ऑलिम्पियाडमधील प्रश्न केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित नसून अंतराळ विज्ञानातील संकल्पनांची समज, तर्कशक्ती, निरीक्षणक्षमता आणि वेगवान निर्णयक्षमता तपासणारे होते. त्यातच परीक्षेसाठी अत्यंत मर्यादित वेळ असल्याने विद्यार्थ्यांसाठी हे मोठे आव्हान होते. मात्र, अंतराळ विज्ञान आणि रॉकेट सायन्समधील आयानच्या संकल्पना स्पष्ट असल्याने त्याला या आव्हानात्मक प्रश्नांची उत्तरे आत्मविश्वासाने देता आली. यावेळी त्याने उल्लेखनीय कामगिरी करत 86.67 टक्के गुण मिळवून पहिला टप्पा यशस्वीपणे पार केल्यानंतर आता आयानची निवड दुसऱ्या टप्प्यासाठी झाली आहे. प्रत्यक्ष प्रयोग, निर्मिती आणि अंतराळ-अभियांत्रिकीवर आधारित हा पुढील टप्पा बंगळुरू येथील विद्याशिल्प अकॅडमीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

Exit mobile version