गॅस टंचाईचा खानावळींना फटका

पीजीधारक विद्यार्थी, नोकरदारांचे हाल

| पनवेल | प्रतिनिधी |

शहरात निर्माण झालेल्या एलपीजी गॅसच्या टंचाईचा परिणाम आता लहान-मोठ्या खानावळींवर दिसू लागला आहे. विशेषत: ऐरोली, कोपरखैरणे आणि घणसोली परिसरातील अनेक खानावळींमध्ये गॅसचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने काही खानावळी तात्पुरत्या बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

परिणामी या भागांतील ‘पेइंग गेस्ट’ (पीजी)मध्ये राहणारे विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला जेवणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नवी मुंबईच्या माहिती तंत्रज्ञान आणि औद्योगिक पट्ट्यांमध्ये नोकरीसाठी बाहेरून येणाऱ्या युवक-युवतींची संख्या मोठी आहे. त्याचसोबत नवी मुंबईतील शैक्षणिक सुविधांमुळे शहराबाहेरील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी नवी मुंबईत वास्तव्यासाठी आहेत. या सर्व घटकांची सोय म्हणून ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली आणि शहराच्या इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पीजी सुविधा उपलब्ध आहेत. या ठिकाणी राहणारे बहुतेक विद्यार्थी आणि नोकरदार खानावळींवरच अवलंबून असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने अनेक खानावळींना स्वयंपाक करणे कठीण झाले आहे.

जेवणाच्या अधिकच्या खर्चाचा ताण
पीजीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, नियमित खानावळ बंद असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करावी लागत आहे. काहींना कार्यालयीन वेळांमुळे जेवणासाठी दूर जावे लागत असल्याने गैरसोय होत आहे. तर काहींना महागड्या हॉटेलांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आर्थिक ताणही वाढला आहे. दरम्यान, खानावळ चालकांनी प्रशासनाने एलपीजी सिलिंडरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत आणखी खानावळी बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शहरातील अनेक खानावळींनी आपल्या पदार्थांमध्ये तात्पुरते बदल केले आहेत. कमी गॅस वापरून शिजवता येणारे अन्नपदार्थ बनवण्याचा प्रयत्न आहे. परंतु, सध्या दोन दिवस पुरेल इतकाच गॅस साठा उपलब्ध असल्याने व्यवसायावरही मर्यादा आल्या आहेत. अनेकांनी आपल्या खानावळी तात्पुरत्या बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे शासनाने गॅस सिलिंडरचा प्रश्न लवकर सोडवावा अशी आमची विनंती आहे.

सचिन म्हात्रे,
खानावळ चालक
Exit mobile version