| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली नाका येथील नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या बस थांब्यावर गॅरेज व्यावसायिक आणि रिक्षाचालकांनी कब्जा केला आहे. त्यामुळे वाशी, पनवेलकडे जाणार्या प्रवाशांना पावसाळा असो वा उन्हाळा, रस्त्यावर जीव मुठीत घेऊन बसची वाट पाहावी लागत आहे. ठाणे ते बेलापूर या मार्गावरील ऐरोली नाका सर्वाधिक गर्दीचा परिसर ओळखला जातो. या ठिकाणी यादवनगर, चिंचपाडा, ऐरोली नाका, समता नगर, ऐरोली सेक्टर-1 ते 2, ऐरोली गाव, महावितरण कॉलनी येथील नागरिक एसटी आणि एनएमएमटीच्या बसने प्रवास करतात. पनवेलच्या दिशेने जाण्याकरिता ऐरोली नाका येथे एनएमएमटीने बस थांबा उभारला आहे.
सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी चाकरमानी त्याचबरोबर दुपारी ऐरोली, वाशीकडे जाणारे शालेय विद्यार्थी या बस थांब्याचा वापर करतात; मात्र काही महिन्यांपासून बस थांब्यामागे रिक्षा दुरुस्तीचे गॅरेज, वेल्डिंग शॉप आणि इतर व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे एनएमएमटीचा हा थांबा गॅरेज व्यावसायिक आणि रिक्षावाल्यांनी गिळंकृत केल्याने या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. तसेच या अतिक्रमणामुळे प्रवाशांना रस्त्यावरच बसची वाट पाहावी लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.