रायगडमध्ये गॅसचा तुटवडा

21 दिवसांनी मिळणार सिलिंडर; हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंता

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

मागील काही दिवसांपासून इस्त्रायल आणि इराण या देशांदरम्यान सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचे पडसाद आता रायगड जिल्ह्यातही उमटू लागले आहेत. जिल्ह्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने नागरिकांसह हॉटेल व इतर व्यावसायिकांमध्ये चिंता वाढली आहे. आठ ते पंधरा दिवसांत मिळणारा घरगुती गॅस सिलिंडर मिळण्यासाठी आता तब्बल 21 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने येथे लहान-मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॉटेज आणि रिसॉर्ट्स मोठ्या प्रमाणात आहेत. पर्यटनावर आधारित व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालत असल्याने जिल्ह्यात घरगुती वापरासोबतच व्यावसायिक वापरासाठीही मोठ्या प्रमाणात गॅसची गरज असते. मात्र, सध्या जिल्ह्यातील अनेक गॅस एजन्सींमध्ये साठा कमी झाल्याने गॅस वितरणावर परिणाम झाला आहे.

काही गॅस एजन्सींमधील साठा पूर्णपणे संपल्याची माहिती समोर येत असून, काही ठिकाणी केवळ दोन दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, घरगुती सिंगल सिलिंडरधारक ग्राहकांना आता गॅस मिळण्यासाठी साधारण 21 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर, डबल सिलिंडर असलेल्या ग्राहकांनाही सुमारे 30 दिवसांनी गॅस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या गॅसची टंचाई अधिक तीव्र असल्याने हॉटेल व्यावसायिकांसह इतर व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पर्यटन हंगामात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यास व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी गॅसचा वापर जपून करावा, असे आवाहन गॅस एजन्सीकडून करण्यात आले आहे.


गॅस वेळेवर मिळाला नाही तर घरातील कामांवर मोठा परिणाम होईल. रोज सकाळी स्वयंपाक करूनच कामावर जावे लागते. जर सिलिंडर 21 दिवसांनी मिळणार असेल, तर गॅस जपून वापरावा लागेल. पण, तो संपला तर घरकामे आटोपून कामावर कसे जायचे, हा मोठा प्रश्न आहे. माझ्याप्रमाणे सर्व गृहिणींना याचा त्रास होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने आणि गॅस कंपन्यांनी यावर लवकर मार्ग काढावा.

सोनाली दांडेकर,
नोकरदार
Exit mobile version