। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा हायस्कूलजवळच्या धोकादायक वळणावर आज पुन्हा एकदा अपघाताचा थरार घडला. गॅस वाहतूक करणाऱ्या एका टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्यालगतच्या टपऱ्यांवर आदळला. अवघ्या आठ दिवसांतील हा दुसरा अपघात असल्याने संतप्त झालेल्या हातखंबा ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला, ज्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.4) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. जयगडहून गॅस घेऊन निघालेला टँकर हातखंबा येथील शाळेजवळच्या तीव्र वळणावर आला असता, चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. हा अनियंत्रित टँकर थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या वडापाव आणि इतर टपऱ्यांना धडकला, ज्यात टपऱ्यांचे मोठे नुकसान झाले.या अपघातातील सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, ज्या वडापावच्या गाडीला टँकरने धडक दिली, तिथे दररोज याच वेळेस शाळेतील मुले वडापाव खाण्यासाठी गर्दी करतात. मात्र, आज मुख्याध्यापकांनी मुलांना काही कारणास्तव शाळेतच थांबवून ठेवले होते. मागील आठवड्यातच याच ठिकाणी अशाच प्रकारचा अपघात झाला होता. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. संतप्त जमावाने रस्त्यावर उतरत महामार्ग रोखून धरला आणि जोपर्यंत यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही, तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका घेतली.घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांचा मोठा फौजफाटा हातखंबा येथे दाखल झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रांत अधिकारी जीवन देसाई यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संतप्त ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि या धोकादायक वळणावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. अधिकाऱ्यांशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर ग्रामस्थांनी आपला रास्ता रोको मागे घेतला आणि महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.





