गौरकामत येथे गॅस्टोसदृश्य साथ


| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील गौरकामत येथे दूषित पाणी पिऊन तेथील अनेकांना उलट्या जुलाब लागले आहेत. त्यात लहानग्यांचा समावेश असून आतापर्यंत दहा रुग्णांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. दरम्यान, त्या दहा रुग्णांपैकी तिघे अत्यवस्थ असल्याची माहिती कर्जत उपजिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

गौरकामत ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थाना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारे नळपाणी योजनेच्या जलकुंभामध्ये एक पक्षी पडला होता. नंतर तो पक्षी मृत झाला, मात्र त्या पक्षाबद्दल कोणालाही काहीही माहिती नव्हती. त्यामुळे मृत पक्षाच्या शरीराचे भाग पाण्यात कुजून गेले आणि ते दूषित झालेले पाणी घरोघरी पोहचले. स्थानिक सर्वच ग्रामस्थ हे पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून पित नाहीत. त्यात त्या पाण्याला दुर्गंधी येत असतानादेखील पावसाळ्यात गढूळ पाणी येत असल्याने ग्रामस्थांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्याचा परिणाम ते पाणी पिऊन गौरकामत गावातील अनेकांना उलट्या जुलाब सुरु झाले. त्या दूषित पाण्याने सुरु झालेले उलट्या आणि जुलाब थांबण्याचे नाव घेत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी खासगी रुग्णालयात उपचार घेण्याचा प्रयत्न केला. कोणताही फरक रुग्णांमध्ये दिसून येत नव्हता. उलट्या जुलाबांची लागण झालेल्या आणि प्रकृती खालावलेल्या 13 रुग्णांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सुरुवात केली. त्यातील दहा रुग्णांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तर तिघांवर गौरकामत येथे आरोग्य उपकेंद्रात सलाईन लावण्यात आले आहे.दहा रुग्ण यांच्यापैकी सात जणांची प्रकृती स्थिर असून अन्य तिघांची प्रकृती खालावली आहे. त्यांना स्थिर करण्याचे प्रयत्न तेथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय मस्कर यांच्यासह अन्य वैद्यकीय पथकाकडून सुरु आहेत.

गौरकामत आदिवासी वाडीमध्ये 60 घरे असून त्या सर्व घरातील आदिवासी लोक हे पिण्याचे पाणी टाकीमधून भरत असतात.त्या टाकीमध्ये पक्षी पडला होता असे आदिवासी कुटुंबांचे म्हणणे आहे.त्यानुसार आमही सर्व सदस्य आणि सरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी यांच्या सोबत पाहणी केली. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी उकळून घेण्यास सुरुवात केली असून उलट्या जुलाब यांची साथ वेळेत आटोक्यात येत आहे. त्याचवेळी असे रुग्ण आढळल्यास त्यांना गावामध्ये असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात औषधे उपचार करण्याची सर्व तयारी सज्ज आहे.

ॲड. योगेश देशमुख.
उप सरपंच, गौरकामत ग्रामपंचायत

आम्ही रुग्ण दाखल होताच गॅस्ट्रोची संभाव्य स्थिती लक्षात घेऊन उपचार सुरु केले आहेत. त्याचवेळी आणखी 25 बेड देखील सज्ज ठेवले असून आता परिस्थिती नॉर्मल होत असून सर्व रुग्ण एक दोन दिवसात आपल्या घरी जातील.

डॉ. विजय मस्कर
वैद्यकीय अधीक्षक कर्जत उपजिल्हा रुग्णालय

Exit mobile version