सहा तास रुग्ण अत्यवस्थ
| नेरळ | प्रतिनिधी|
कर्जत तालुक्यात चार ठिकाणी शासनाची 108 क्रमांकाची रुग्णवाहिका आहे. 108 या क्रमांकावर कॉल केल्यानंतर 15 मिनिटात रुग्णवाहिका पोहचली पाहिजे असे शासनाने संबंधित रुग्णवाहिका पुरविणाऱ्या ठेकेदार कंपनीला निर्देश असताना कर्जत मध्ये चक्क सहा तासांनी रुग्णवाहिका पोहचली आहे. दरम्यान, रुग्ण अत्यवस्थ असताना असा हलगर्जीपणा आरोग्य विभागाकडून केला जात असल्याने आरोग्य विभागाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
कर्जत तालुक्यातील सालपे आदिवासी वाडीमधील अनंता लक्ष्मण वाघमारे (35) आणि सांगवी आदिवासीवाडी येथील गोरखनाथ काळुराम पवार (25) या दोघांच्या गाडीचा अपघात झाला. त्यावेळी सायंकाळ होत आल्याने स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. प्राथमिक उपचार घेतल्यावर पुढील उपचारासाठी नेण्याकरिता रुग्णासाठी आवश्यक असलेली रुग्णवाहिका अनेक ठिकाणी संपर्क करून देखील रुग्णवाहिका उपलब्ध व्हायला सहा तास लागले. अपघातानंतर 108 क्रमांकाची रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध झाली नाही. त्यामुळे अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना रुग्णवाहिकेची वाट पाहत बसावे लागले. कर्जत कोंडीवडे मार्गावर शिरसे ते आकुर्ले भागात दोन दुचाकीच्या धडकेत हे दोघे गंभीर जखमी झाले होते. स्थानिकांनी त्या दोन्ही जखमी यांना तातडीने कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयात डॉ. सी के मोरे यांनी प्रथमोपचार करून जखमी तरुणांच्या अंगावरील जखमा या गंभीर स्वरूपातील असल्याने तातडीने उल्हासनगर येथील रुग्णालयात जाण्यास सांगितले.त्यानंतर 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन करण्यात आला. मात्र, गाडी खराब आहे, टायर पंक्चर झाला आहे, गाडी खोपोलीत किंवा नेरळमध्ये आहे, अशी कारणे दिली जात होती.
सात वाजता रुग्णवाहिका पाहिजे म्हणून सुरू झालेले प्रयत्न यांना रात्री 12 वाजता यश आले. सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आणि रुग्णवाहिक मिळावी यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध झाली आणि रुग्णांना उल्हास नगर येथे मध्यरात्री नंतर पाठवून देण्यात आले.







