| अलिबाग | प्रतिनिधी |
आगरी समाज संस्था, अलिबागतर्फे आयोजित अलिबागमधील आगरी बांधवांची पहिली मासिक सभा शनिवारी (दि.18) सायंकाळी श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेला अलिबाग शहरासह परिसरातील अनेक आगरी बांधवांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
समाजातील कार्यकर्त्यांनी आगरी संस्कृतीचे संवर्धन, तरुण पिढीचा सहभाग, शिक्षण, रोजगार, विवाह आणि सामाजिक ऐक्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन केले. आगरी समाजाला संघटित करून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले. या सभेच्या यशस्वी आयोजनासाठी सचिन पाटील, प्रभाकर ठाकूर, राजेंद्र पाटील, दर्शना पाटील, मनोहर पाटील आणि श्रेयस ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम उत्तम पद्धतीने पार पडला. बैठकीचा समारोप एकता, सहभाग आणि विकास या त्रिसूत्रीचा संकल्प घेऊन करण्यात आला. पुढील महिन्यात पुन्हा अशा सभेचे आयोजन करून समाजकार्यात सातत्य ठेवण्याचे ठरविण्यात आले.






