| उरण | प्रतिनिधी |
दिवाळी सणाला थोडेच दिवस राहिले आहेत. त्यामुळे उरण बाजारपेठेत पणत्या, कंदील, दिवे, रांगोळी, सजावटीचे साहित्य, मिठाई आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
उरण बाजार पेठेतील आनंद नगर, मुख्य बाजारपेठेत विविध आकाराच्या, रंगीबेरंगी पणत्या, आकाश कंदील, रांगोळीचे ठसे बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. दिवाळीचा सण आनंदात साजरा करण्यासाठी, नागरिकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सजावटीच्या वस्तू, पणत्या, आकाशकंदील, तोरणे आणि इतर घरगुती सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली आहे.
लहान आकाराच्या पणत्या – 40 ते 70 रुपये डझन, मोठ्या रंगीत पणत्या – 80 ते 120 रुपये 4 नग, मोठे दिवे – 80 ते 150 रुपये, लहान कंदील – 100 रुपये, मध्यम आकाराचे कंदील – 250 ते 350 रुपये, मोठे कंदील – 500 ते 3000 रुपये आदी दराने विकले जात आहेत.





