| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरापासून दहीवली भागातून गौरकामत गावाकडे जाणार्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे त्या रस्त्यावरून जाणारे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कर्जत येथून दहीवली गावातून गौरकामत आणि पुढे हा रस्ता जांभिवली असा तांबस कडाव होऊन चिंचवली गावाकडे जातो. या राज्यमार्ग दर्जाच्या रस्त्यावर मागील दहा वर्षांत अनेकवेळा डांबरीकरण केले गेले आहे. गेल्या काही वर्षात हा रस्ता किती वेळा बनवून झाला असेल आणि दरवेळी पावसाळा आला की असे खड्डे या भागातील रहिवाशांसाठी अपघाताला कारणीभूत बनत आहेत. दहिवली ते गौरकामत या रस्त्यावर छोटे वेणगाव, मोठे वेणगाव, वदप, कुशीवली, गौरकामथ, जंभिवली ही गावे आहेत. या रस्त्यावरून नोकरदार वर्ग, शाळा, कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि व्यावसायिक त्याचप्रमाणे रिक्षाचालक हे खड्ड्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असतात. या रस्त्यांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्ती झाली नाही तर मात्र स्थानिक रहिवासी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. येत्या आठवडाभरात रस्त्याचे दुरुस्तीचे काम झाले नाही तर येथील सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.