| पाताळगंगा | वार्ताहर |
पावसाळा आला की, पूर्वी खेड्यापाड्यातच नव्हे तर शहरातही रोजच्या जेवणात रानभाज्यांची रेलचेल असायची. गरीब कुटुंबे पावसाळाभर या रानभाज्यावरच बहुधा अवलंबून असत. मात्र ग्रामीण भागात वाढत्या बांधकामामुळे या रानभाज्या सध्या दुर्मिळ झाल्याचे चित्र असून, रानावनात दिसणार्या रानभाज्याही जंगलाच्या र्हासामुळे आता दिसेनाशा झाल्या आहेत.
रानभाज्यांमुळे आदिवासी बांधवांना काही प्रमाणात रोजगारही मिळत असतो. शिवाय निसर्गाच्या मुळाशी अनेक प्रकारच्या रानभाज्या सहज निर्माण होत असल्याने या रानाभाज्यांचे महत्त्व दैनंदिन जीवनात अजूनही घटले नाही. यामुळे बाजरात तसेच रहदारीच्या ठिकाणी रानभाज्या दिसू लागल्या आहेत. प्रामुख्याने यामध्ये कंटुली, आंबट बिंदुकली, कोळी, रानतेरि, लोथ, करडू, बोकर, कवळा, टाकला, भारंगी या भाज्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असल्यामुळे या भाज्यांना आयुर्वेदात चांगले महत्त्व आहे. यामुळे या रानभाज्या ग्रामीण तसेच शहरी भागात आवडीने खाल्ले जाते. रानभाज्या विकून घरचे भागवणे सोपे जाते तसेच दिवसाला दोनशे-तीनशे रुपये मिळत असल्याने घरातील खर्च भागविले जाते.तसेच या रानभाज्या रुचकर आणि चवदार असल्याने अनेक जण खरेदी करतात, असे रान भाज्या विकत असलेल्या महिलांनी सांगितले.