। नेरळ। प्रतिनिधी।
कर्जत तालुक्यातील पळसदरी- खोपोली राष्ट्रीय महामार्गावरील नांगुर्ले वळणावर आज सकाळी अपघात झाला. दोन टेम्पोमध्ये झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले असून, कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत – पळसदरी- खोपोली या राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी नांगुर्ले आदिवासी वाडी जवळ असलेले वळणावर दोन टेम्पोत जोरदार धडक झाल्याने अपघात झाला. यावेळी मोठा टेम्पो खोपोलीकडे जात होता तर लहान टेम्पो खोपोली कडून उल्हासनगरच्या दिशेने जात होता. नांगुर्ले वळणावर सकाळी साडे सहा वाजता हा अपघात झाला. यावेळी दोन्ही गाड्या एकमेकांवर आदळल्याने रस्त्यावर पलटी झाल्या. यामुळे दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत. येथील आदिवासी वाडीतील लोकांनी या दोन्ही चालकांना गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही गाड्यांच्या चालकांना जबरी मार लागला असून त्यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचार सुरू असून कर्जत पोलीस ठाणे येथे या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. स्थानिक आदिवासी रहिवाशांनी वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे.







