। उरण । प्रतिनिधी ।
भारत सरकारच्या मंत्रिमंडळ नियुक्ती समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेत, आयएएस गौरव दयाल यांची जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए)चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयांतर्गत ही नियुक्ती संयुक्त सचिव स्तरावर करण्यात आली आहे. गौरव दयाल यांची पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत जबाबदारी देण्यात आली आहे. ते संजय सेठी यांची जागा घेणार आहेत, ज्यांनी गेल्या काही वर्षांत जेएनपीटीच्या कार्यप्रणालीला नवीन गती दिली होती. या निर्णयावर बंदर उद्योगात लक्ष वेधले जात असून, गौरव दयाल यांच्या नेतृत्वाखाली जेएनपीटीचे नवे विकास प्रकल्प व आंतरराष्ट्रीय गुंतवणुकींना नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे.







