बेवारस गायीला दिले जीवदान

| खांब-रोहा | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील खारी येथे अपघातामुळे दोन दिवसांपूर्वी रस्त्यालगत एक बेवारस स्थितीत पडलेल्या गायीवर पशुपक्षी जीवनदान संघटनेचे पदाधिकारी यांच्या सहाय्याने आणि तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय सांगळे व त्यांच्या टीमने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून तिला जीवदान दिले आहे.

खारी येथे अपघातामुळे दोन दिवसांपूर्वी रस्त्यालगत अपघातग्रस्त गाय पशुपक्षी जीवनदान संघटनेचे अनिकेत पाडसे, निरज म्हात्रे, दिनेश शिर्के यांच्या निदर्शनास आली. त्यांनी गायीवर तातडीने प्रथमोपचार करण्यासाठी रायगड जिल्हा पशु वैद्यकीय व पशुसंवर्धन अधीक्षक डॉ.श्याम कदम यांच्याकडे संपर्क साधला. दुसर्‍याच दिवशी अधीक्षक डॉ. कदम यांच्या निर्देशानुसार तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय सांगळे आणि त्यांचे सहकारी डॉ. रवि राठोड, डॉ. वसंत गोगटे यांनी गायीच्या पायावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून तिला जीवदान दिले.

जखमी गाय खारी येथीलच श्रीदेवी खन्ना यांच्या निवासस्थानी उपचार व देखरेखीकरिता काही दिवस ठेवण्यात येणार असून, पूर्ण बरी होताच तिला गो शाळेमध्ये पाठविले जाणार असल्याचे मुक्या प्राणी पशु पक्षी जीवनदान संघटनेचे अनिकेत पाडसे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

Exit mobile version