। पनवेल । वार्ताहर ।
पुणे आणि इतर शहराबरोबरच पनवेल महानगरपालिका क्षेत्रात जीबीएस रुग्ण आढळून येत आहेत. खाजगी रुग्णालयामध्ये ते उपचार घेत असून ते एक महागडे आणि खर्चिक आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला ते परवडणारे नसून मनपा प्रशासनाने यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे.
गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणजेच जी बी एस हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. एखादा विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे हा आजार होत असल्याचा अंदाज आहे. बहुतांश आजारात जर एखाद्या रोगाने हल्ला केला, तर आपली रोगप्रतिकार शक्ती शरीराचा बचाव करते. मात्र यात हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते. जीबीएस या रोगाची लागण झाल्यानंतर शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती आजूबाजूच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. यात नसांना प्रभावीपणे सिग्नल पाठवता येत नाहीत. तसेच मेंदूला सूचनांचं पालन करणंदेखील स्नायूंना शक्य होत नाही. तसेच इतर शरीराकडून मिळणारे संकेत कमी होतात. याबाबत आपण ज्ञात आहातच. पनवेल परिसरामध्ये काही ठिकाणी अशा प्रकारचे रुग्ण आढळू लागले आहेत. कामोठे वसाहती जीबीएसची लागण झालेले रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत दक्ष राहण्याचे सुचित केलेले आहे. केंद्र व राज्य सरकारकडून ही मार्गदर्शक तत्व देण्यात आलेले आहेत. पुण्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. पनवेल महानगरपालिकेने संबंधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी त्यांना मोफत वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात अशा आशयाचे पत्र सतिश पाटील यांनी आयुक्तांना दिले आहे.