। पनवेल । प्रतिनिधी ।
माणसांचे आयुष्य असलेली पुस्तके जगण्याला उभारी देतात, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी केले आहे. कोकण मराठी साहित्य परिषद व श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘साहित्याची आनंद वारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
नमिता कीर पुढे म्हणाल्या की, आपण गुढ्या उभारतो ती आपली परंपरा आहे; परंतु, खर्या अर्थाने पुस्तकांची गुढी प्रत्येकाच्या घरी उभारली गेली पाहिजे.पुस्तके वाचली पाहिजेत. माणसांचे आयुष्य म्हणजे पुस्तक असते, त्यांच्यासाठी तो लढा असतो, संघर्ष असतो. पुस्तकातून आपल्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात, असे कीर यांनी सांगीतले.
या साहित्यिक कार्यक्रमांतर्गत कवितेचा जागर, विद्यार्थ्यांनी दिलेल्या पुस्तकांची ज्ञानरूपी गुढीचे मान्यवरांचे हस्ते पूजन, त्याचप्रमाणे सावित्रीच्या लेकी म्हणून कर्तुत्ववान महिला व महिला बचत गट यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष धनराजजी विसपुते, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्कप्रमुख प्रा.एल.बी. पाटील, रायगड जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुधीर शेठ, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी आदी उपस्थित होते.