। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसरात सिडको वसाहतीत मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाल्याने सिडको प्रशासनाच्या नावाने नागरिकांमध्ये दिवसेंदिवस नाराजी वाढत चालली आहे. शहरात असुरळीत पाणी पुरवठा सुरु असला तरी नळाला मात्र कमी दाबाने येणार्या पाण्यामुळे पनवेलकरांचा घसा कोरडा पडत आहे. त्यावर उपाय योजना म्हणून मार्केटमध्ये यावर्षी पाणी साठवून ठेवण्याच्या इमच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
अजून पावसाळा सुरू होण्याकरता दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. पनवेल शहराला पाणी पुरवठा करणार्या आप्पा साहेब वेदक जलाशयाने आत्ताच तळ गाठला आहे. वर्षाच्या सुरवाती पासून एमआयडीसी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून वारंवार शटडाऊन घेतला जात आहे. त्याचबरोबर आणीबाणी तर उन्हाळ्यात टंचाई भासू नये यासाठी देहरंग धरणात पाणी साठवून ठेवण्यात येणार होते.
पनवेल शहरासाठी दररोज 27 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. एमआयडीसी आणि एमजेपीकडून देहरंग घरणातील पाणी शहराला दिले जाते. एमआयडीसी व एमजेपी पातळगंगा नदीतून पाणी उचलतात. परंतु, या ठिकाणी वारंवार शटडाऊन घेतला जातो. त्यामुळे सच्या देहरंग धरणातून जास्त उपासा करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसी यांच्या कडून पनवेल शहराला कमी पाणी पुरवठा होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसी यांच्याकडून सरासरी पेक्षा कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याने पनवेलकरांची सध्या तहान ही गाडेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात भागवली जात आहे.