| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई पोलिसांच्या पोर्ट झोनमध्ये तैनात असलेले डीसीपी सुधाकर पठारे यांचे अपघातात निधन झाले. ते प्रशिक्षणासाठी हैदराबादला गेले होते. शनिवारी (दि.29) रोजी ते एका नातेवाईकासोबत ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असताना रस्त्यात अपघात झाला. या अपघातात त्यांचा आणि त्यांच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मुंबई पोलिसांनाही देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएस सुधाकर पठारे हे तेलंगणातील श्रीशैलमहून नगरकुर्लुणला जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुधाकर पठारे ज्या कारमधून प्रवास करत होते, ती एका ट्रकला धडकली. त्यामुळे हा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सुधाकर पठारे यांच्या अपघातामुळे महाराष्ट्र पोलीस दलात शोकाचे वातावरण आहे.
सुधाकर पठारे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील वळवणे येथील रहिवासी होते. आयपीएस होण्यापूर्वी त्यांनी अनेक सरकारी विभागात अधिकारी म्हणून काम केले होते. सुधाकर पठारे यांनी एमएससी (कृषी) आणि एलएलबी केले होते. 1995 मध्ये स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर ते जिल्हा विशेष लेखापरीक्षक झाले. यानंतर, 1996 मध्ये त्यांची विक्रीकर अधिकारी वर्ग 1 म्हणून निवड झाली. 1998 मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर ते पोलीस विभागात रुजू झाले. आतापर्यंत सुधाकर पठारे यांनी पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी चंद्रपूर, वसई येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अमरावती येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे शहरात पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच त्यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या विविध कार्यक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेतला होता.