नागरीकांनी काळजी घ्यावी – आयुक्त मंगेश चितळे
| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
पुणे व इतरत्र गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या नव्या दुर्मिळ आजाराचे संशयित रुग्ण आढळून येत आहे. दूषित पाणी व शिळ्या अन्नातून जंतू पोटात जातात आणि ते आपल्या पेशींवर हल्ला करून त्या निकामी करतात. त्यामुळे जीबीएसचा धोका निर्माण होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.
गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे
या रुग्णांना तीव्र स्वरूपाचे जुलाब , ताप, अंगदुखी अशी लक्षणे सुरुवातीला निर्माण झाली आणि त्यानंतर पायामधील ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसू लागतात. काही रुग्णांमध्ये अल्प कालावधीमध्ये स्नायूंमधील ताकद कमी होत जाऊन श्वसनाला अडथळा निर्माण व्हायला लागल्याने कृत्रिम श्वसनासाठी त्यांना मध्ये ऍडमिट करावे लागते.
हा गिलियन बॅरी सिंड्रोम आजार काय आहे ?
या आजाराचा शोध फ्रेंच न्यूरोलॉजिस्ट जॉर्ज गिलीयन आणि जीन अलेक्झेडर बॅरी आणि यांनी 1916 साली लावला म्हणून त्यांच्या नावामुळे या आजाराचे नाव गिलियन बॅरी सिंड्रोम असे पडले.
हा काही नवीन आजार नाही, भारतामध्ये या आजाराच्या केसेस आढळत असतात. या आजारामध्ये माणसाची स्वतःचीच प्रतिकारशक्ती स्वतःच्या मज्जा संस्थेवरती हल्ला चढवते. शरीरातील नसा आणि स्नायू याचे कार्य त्यामुळे बाधित होते.
एकुणच या रोगाची लक्षणे लक्षात घेता पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांनी जेवणापूर्वी व शौचास जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे, पुर्ण शिजवेले,ताजे अन्न खावे, रस्त्यांवरील उघडे अन्नपदार्थ खावू नये. जिथे स्वच्छता पाळली जात नाही अशा ठिकाणी खाणे, पाणी पिणे टाळावे. गुइलेन बॅरे सिंड्रोम ची लक्षणे दिसू लागल्यास नजिकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी केले आहे.