| अलिबाग | खालापूर । प्रतिनिधी |
महिला सक्षमीकरण, संस्कृतीचे संवर्धन, विचारांची देवाणघेवाण हा उद्देश समोर ठेवून गेल्या 30 वर्षाची कृषीवलने हळदीकुंकू समारंभाची परंपरा जपली आहे. खालापूर तालुक्यातील महिला या नाविन्य उपक्रमातून एकत्र याव्यात, यासाठी कृषीवलच्या माजी व्यवस्थापकिय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या पुढाराने खालापूर फाटा येथील कटरमल मैदानात हा हळदी कुंकू सोहळा बुधवारी (दि.29) मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभात पाच हजारहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे खालापूर हळदीकुंकू समारंभाने फुलला होता.
पारंपरिक मराठमोळा पेहराव करीत दुपारी साडेतीन वाजल्यापासून महिलांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी केली होती. खालापूरमध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी महिलांनी बघता बघता अलोट गर्दी केली. शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलन करून हळदीकुंकू समारंभाला सुरुवात झाली.
यावेळी नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, खालापूर नगराध्यक्षा रोशना मोडवे, सामाजिक कार्यकर्त्या कांचन जाधव, उज्वला निधी, माजी उपनमराध्यक्ष विनीता आवटी, वैशाली जाधव, प्रमिला सुर्वे, डॉ. शर्वरी घुमरे, तृप्ती जंगम, स्नेहा कडव, संतोष जंगम, ऋषी चाळके, लिला मोकाशी, रणरागिनी ग्रुप खालापूरचे पदाधिकारी व सभासद महिला, तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून सौभाग्याचे वाण लुटले. शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, खालापूरच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांच्यासह खालापूर तालुक्यातील शेकाप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी, उपस्थित असंख्य महिलांचे औक्षण केले. यावेळी एकमेकींना हळदीकुंकू लावून विचारांचे आदान प्रदान करण्यात आले. महिला सक्षमीकरणाचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी एकमेकींना दिला.
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
कृषीवल हळदी कुंकू समांभाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. अपघाग्रस्तांना मदत करणाऱ्या महिलांसह औद्योगिक क्षेत्रातील महिलांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उत्कृष्ठ व्यावसायिक कांचन जाधव, अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या भक्ती साठीलकर, कुस्ती खेळात यश संपादन करणाऱ्या खेळाडू क्षितीजा मरागजे, क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शितल गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवानी
खालापूरमध्ये कृषीवल हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमांमध्ये महिलांसाठी खास मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्थानिक कलाकारांनाही हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. सुरुवातीला कथ्थक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर सोनाली पवार यांचे मराठी गाण्यांबरोबरच कोळीगीतांच्या गाण्यांवर सादरीकरण झाले. त्यामुळे हा कार्यक्रम अधिकच बहरून गेला. खालापूर मधील तरुणींसह महिलांनीदेखील आपली कला सादर केली. हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने मनोरंजनात्मक कार्यक्रमातून स्थानिकांना विशेष करून महिलांना व्यासपीठ खुले झाल्याने महिलांनी कृषीवलचे आभार मानले.
गेल्या आठ दिवसात या सोहळ्याचे नियोजन केले आहे. कर्तबगार महिलांचा सन्मान करण्याची संधी या कार्यक्रमातून मिळाल्याचा आनंद आहे. कृषीवल व चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून हळदी कुंकू समारंभ होत आहे. आज सर्वच महिला सेलिब्रीटी म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. या उपक्रमात सर्व स्तरातील महिला सहभागी झाल्याचा आनंद आहे.
शिवानी जंगम, माजी नगराध्यक्ष