शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून जिते, पोयनाड गावांना रुग्णवाहिका

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या आमदार निधीतून पेण तालुक्यातील जिते तसेच अलिबाग तालुक्यातील पोयनाड या दोन गावांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या असून सदर रुग्णवाहिकांचे लोकार्पण आ. जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती अ‍ॅड निलीमा पाटील, माजी अध्यक्ष तथा पक्ष प्रतोद अ‍ॅड आस्वाद पाटील, जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील, माजी सभापती डी बी पाटील, शेकापक्षाचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रदीप नाईक, अलिबाग पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, सदस्य रचना पाटील आदी उपस्थित होते.
आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत योजनेतून सदर रुग्णवाहिका उलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. त्यासंदर्भातील सदर रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी आमदार जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी तथा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांना निर्देश दिले होते. त्यानुसार रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी 34 लाख रुपयांच्या निधीला तांत्रिक मंजुरी देण्यात आल्या नंतर नुकतीच सदर रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली.
जिते व पोयनाड पंचायतीं हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्राना या रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने या भागातील नागरिकांना वेगवान वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल असा विश्‍वास आ जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Exit mobile version