| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
तालुक्यातील झिराड या ठिकाणी अद्ययावत तलाठी कार्यालय उभे करण्यात येणार आहे. तलाठी कार्यालय उभारणीसाठी स्व. अरविंद दादा पाटील यांच्या कुटूंबियांनी साडेसात लाख रुपये देणगी स्वरुपात दिले असून या तलाठी कार्यालयाच्या नियोजीत वास्तूचा भुमीपुजन सोहळा शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील गुरुवारी उत्साहात पार पडला.
अलिबाग तालुक्यातील झिराड या ठिकाणी असलेल्या तलाठी कार्यालयाची इमारत जीर्ण झाली होती. त्याऐवजी नवीन अद्ययावत अशी वास्तू उभारण्यासाठी जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी पुढाकार घेतला. झिराड गावांतील दिवंगत अरविंद दादा पाटील यांच्या कुटुंबियांनी तलाठी कार्यालय उभारणीसाठी सात लाख 50 हजार रुपयांचा निधी देणगी स्वरुपात दिला.
शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गुरुवारी ( दि 07 ) रोजी अद्ययावत तलाठी कार्यालयाच्या वास्तुचा भुमीपुजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, दिवंगत अरविंद पाटील यांचे नातेवाईक विजय पाटील, मनोहर पाटील, झिराडच्या सरपंच दर्शना भोईर, उपसरपंच सुजाता माने, माजी उपसरपंच संध्या गावडे, अॅड. के. डी. पाटील, सर्व सदस्य, ग्रामसेवक संजय पाटील, महेश माने, रवि म्हात्रे, हरेश भोईर, अॅड. भुपेंद्र म्हात्रे आदी मान्यवरांसह, साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.