बँक ऑफ इंडियाकडून कर्ज मेळावा

। नेरळ । वार्ताहर ।
कोरोना महामारी संकटात ग्राहक आणि कर्ज देणार्‍या बँकांची दरी वाढली होती. ती दरी मिटावी आणि दुर्गम भागातील गरीब व गरजू जनतेला व्यवसाय किंवा अन्य कामासाठी बँकांकडून सहकार्य घेऊन मदत करण्याचा आमचा हेतू आहे. त्यासाठी आम्ही आपल्या दारी आलो असून उद्योग व्यवसायाला लागावे तसेच विशेषतः महिला बचत गटांना सहकार्य करून महिलांना सुद्धा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाच्या रायगड विभाग प्रमुख शंपा बिश्‍वास यांनी व्यक्त केले. बँक ऑफ इंडिया जिल्हा अग्रणी बँक रायगड यांच्या विद्यमाने कर्जत मधील रॉयल गार्डनच्या सभागृहात कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात आठ बँका सहभागी झाल्या असून गेल्यावर्षी तीन हजार नऊशे कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे धोरण होते, परंतु प्रत्यक्षात दोन हजार 700 कोटी रुपयांचे कर्जाचे वाटप करण्यात आले. या मेळाव्यात 66 जणांना दोन कोटी 76 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बानखेले, नायब तहसीलदार सुधाकर राठोड,कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, डॉ. रवींद्र मर्दाने, सिद्धेश राऊळ, राजू नेमाडे, मनोहर पादिर, रमण पारकर, सौम्या गुज्जर, स्नेहल हंडगर आदी उपस्थित होते.यावेळी उपव्यवस्थापक रमण पारकर आणि मनोहर पादिर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक कलेे.

Exit mobile version