संजय मोहिते यांचे प्रतिपादन
| पनवेल | प्रतिनिधी |
डिजिटल क्रांती झाल्यामुळे दैनंदिन जीवनातील सर्व आर्थिक व्यवहार आणि संपर्क मोबाईल व कॉम्प्युटरच्या माध्यमातून होत आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञानात क्रांती होत असून, याचाच गैरफायदा घेऊन सायबर क्राईमचे प्रमाणही वाढत चालले आहे. सर्वसामान्य जनतेची फसवणूक व विविध आमिषे दाखवून लूटमार करण्याचे सर्रास प्रकार सायबर विश्वात घडत आहेत. ते उघडकीस आणण्यासाठी त्याच क्षमतेचे व तोडीचे परिपूर्ण ज्ञानयुक्त पोलीस दल असणे आवश्यक आहे. ‘नॉलेज इज पॉवर’ या उक्तीप्रमाणे तुमची खरी शक्ती ही नॉलेज आहे. त्यामुळे सायबर क्राईमविषयी परिपूर्ण ज्ञान मिळवा, असे मत नवी मुंबई पोलीस सहआयुक्त संजय मोहिते यांनी व्यक्त केले.
वाढत्या सायबर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना अद्ययावत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने वाशी येथील भारती विद्या भवन केंद्रात नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकार्यांसाठी ‘डिजिटल फॉरेन्सिक अँड सायबर क्राईम ट्रेनिंग’ या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले असून, पोलीस सह आयुक्त संजय मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि.31 मार्च) संध्याकाळी या प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला. यावेळी पोलिसांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे सरचिटणीस हरीश अय्यर, व्यवस्थापन समितीचे सदस्य चारूहास साटम, जागतिक कीर्तीच्या फॉरेन्सिक शास्त्रज्ञ डॉ.रुक्मिणी कृष्णमूर्ती, प्रख्यात योगविद्या अभ्यासक स्वामी योगप्रताप, पनवेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, प्रताप गावंड, नाना म्हात्रे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.