। पनवेल । वार्ताहर ।
पालिकेच्या कंत्राटदाराने कर्मचार्याच्या भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) दोन वर्षांचे पैसे भरले नसल्याने पनवेल शहरातील घंटागाडी कर्मचार्यांनी मंगळवारी (ता. 31) काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
पनवेल पालिकेच्या स्थापनेपूर्वी पालिकेत समाविष्ट पनवेल नगरपालिका क्षेत्र व ग्रामपंचायत क्षेत्र वगळता इतर सिडको वसाहतींमधील कचर्याची वाहतूक व विल्हेवाट लावण्याचे काम सिडकोने नेमलेल्या कंत्राटदाराकरवी केले जात होते. पालिकेच्या स्थापनेनंतर पालिका हद्दीतील घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी पालिकेवर टाकण्यात आल्याने पालिकेने नेमलेल्या कंत्राटदाराकरवी सध्या पालिका हद्दीतील कचर्याचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापनेची जबाबदारीदेखील पालिकेने नेमलेल्या याच कंत्राटदारावर असून पालिकेने नेमणूक केलेल्या कंत्राटदाराने मागील दोन वर्षे कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे पैसे भरले नसल्याने बोलले जात आहे. शिवप्रेरणा श्रमिक कामगार संघटनेच्या 100 कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. पीएफ नाही तर काम नाही, अशी घोषणा देत पीएफचा भरणा होईपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून कोणताही निर्णय न घेतला गेल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा व पालिका हद्दीतील इतर भागातदेखील हे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार महानगर संघटक प्रथमेश सोमण यांनी व्यक्त केला आहे.