। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत नगर परिषदेची सर्वसाधारण सभा 31 मे रोजी संपन्न झाली या सभेमध्ये कचरा, नाले सफाई, अनधिकृत बांधकाम तसेच कर्मचारी यांच्या विषयांवर वादविवादात गरमा गरम वातावरणात ही सभा संपन्न झाली. सुरवातीस विरोधी पक्षाचे सदस्य आक्रमक दिसले मात्र सभेत शांत बसले परंतु सत्ताधारी सदस्य यांनी सभेत कर्मचारी वर्गाबाबत जोरदार चर्चा केली.
सभागृहात सभेस बसलेले विरोधी पक्षाचे नगरसेवक सभेच्या वहीत स्वाक्षरी करण्यास तयार नव्हते, त्यावर नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी कोरम पूर्ण झाला असेल तर सभेस सुरुवात करू असा पवित्रा घेतला मात्र कोरम पूर्ण न झाल्याने सभेस सुरुवात करता आली नाही. उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल आरोग्य खात्याच्या सभापती असून मला याबाबत विश्वासात घेतले जात नाही असे सांगितले, तर मधुरा चंदन यांनी कर्मचारी वर्ग नगरसेवकांना रिस्पेक्ट दिला जात नाही अशा म्हणाले. यावर जोशी यांनी अशा कर्मचार्यांच्या विषयी तक्रार द्या संबंधित कर्मचार्यांवर कारवाई करा अशा सूचना त्यांनी मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांना दिल्या.
राहुल डाळिंबकर यांनी नगरपरिषदेची पाणी योजनेला वीस पंचवीस वर्षाचा कालावधी झाला आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढत आहे, नगरपरिषदेच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव करावा तसेच नगरपरिषद क्षेत्रातील काही ठिकाणी काही प्रभागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे सांगितले. भारती पालकर यांनी नगरपरिषद क्षेत्रात प्रवेशद्वाराचे काम सुरू आहे ते निकृष्ट दर्जाचे आहे या ठिकाणी एक-दोन अपघाती झाले आहेत तर शरद लाड यांनी ह्या ठिकाणाहून सर्विस रोड जाणार आहे त्याबाबत ती जागा सोडली आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला. शहरातील काही रस्त्यांवर पेवर ब्लॉक बसले होते तते खचून त्या ठिकाणी खड्डे पडले होते. नगराध्यक्ष जोशी यांनी पावसाळ्यापूर्वी ही सर्व खड्डे भरले तसेच गतिरोधक बसवले त्याबद्दल राहुल डाळींबकर यांनी जोशी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. सदर सभेस विविध कामांना मंजुरी देण्यात आली. आयत्या वेळेच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेस उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी सुरेखा भणगे, ज्योती मेंगाळ,भारती पालकर,सुवर्णा निलधे, शरद लाड, विवेक दांडेकर, विशाखा जिनगरे, प्राची डेरवणकर, नितीन सावंत, बळवंत घुमरे, पुष्पा दगडे, सोमनाथ ठोंबरे, राहुल डाळिंबकर, मधुरा चंदन, स्वामिनी मांजरे, उमेश गायकवाड उपस्थित होते.