संरक्षण कठडे नसल्याने अपघाताची शक्यता
| पाताळगंगा | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील घोडीवली, नावंढे व इतर गावांच्या दळणवळणासाठी अनेक वर्षांपूर्वीचा घोडीवली-अंजरुण रस्त्यावरील असलेला पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या पूलाला संरक्षण कठडे नसून जागोजागी खड्डे पडल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेत हा पूल दुरुस्त करावा, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
घोडीवली, नावंढे ही गावे जूनी असून दोन ते अडीच हजाराहून अधिक लोकवस्ती आहे. या गावातील नागरिकांसाठी अनेक वर्षापूर्वी गावाजवळून वाहणार्या नदीच्या पात्रावर पूल बांधण्यात आल्याने या रहिवाशांना आजूबाजूच्या गावाशी व मुंबई-पुणे हायवेला संपर्क करणे सोयीचे झाले आहे. या पूलावरून दररोज हजारो लोक, शाळकरी विद्यार्थी, चाकरमानी तसेच वाहनांची रहदारी असून या पूलावरील काँक्रिटीकरणाला खड्डे पडल्याने त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे दुचाकी वाहनांना खड्डे लक्षात येत नसून हे अपघाताला कारण ठरत आहेत, त्यातच या जुन्या पुलाला दोन्ही बाजूंनी संरक्षण कठडे नसल्याने अपघाताची भीती वर्तवली जात आहे.
या पुलावरून प्रवास करणे मोठ्या जिकरीचे बनत असल्याने अनेकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असली तरी संबंधित प्रशासन याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत असल्याने गेल्या काही वर्षापासून पुलाची डागडुजी झाली नाही. तरी संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य घेत पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे, जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नाही.
आजवर या पुलाची दुरुस्ती झालेली नाही. तर संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे. वेळीच उपायययोजना न केल्यास होणार्या अपघातास संबंधित प्रशासन जबाबदार असेल.
नवज्योत पिंगळे
ग्रामस्थ, घोडीवली