घोटच्या शेतकर्‍यांचा जमीन संपादनाला विरोध

बिल्डर मनिष भातिजा ग्रामस्थांनी रोखले
जमीन घोटाळ्यात भाजप नेत्यांचा सहभाग?

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल तालुक्यातील घोट येथील शेतकर्‍यांच्या जमिनी बांधकाम व्यावसायिक मनिष भातिजा यांच्याकडून हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला असून याठिकाणी विकासकाने हडप केलेल्या जमिनीची मोजणी करण्यासाठी भूसंपादन विभागाचे अधिकारी पोलिस फौजफाट्यासह आले मात्र यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा कडाडून विरोध केला. याबाबतची तक्रार शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत आणि पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांनी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे केली आहे. तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळातील हे प्रकरण असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
मौजे घोट येथील जमीन सर्व्हे नंबर 33/0, 61/0, 62/0 मधील जमिनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने भतिजा बांधकाम व्यावसायिकाने सन 2017 साली बेकायदेशीररीत्या आपल्या ताब्यात करून घेतल्या. अशाच पद्धतीने या बांधकाम व्यावसायिकाने खारघर आणि रोहींजण येथील जमिनी हडप केल्या आहेत.याबाबत गृहराज्यमंत्री देसाई यांच्याकडे निवेदन सादर करुन भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने थांबविण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, ज्ञानेश्‍वर भंडारी, घोटमधील माजी सरपंच सुनील पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. तर जमीन मोजणी सर्व्हेला विरोध करण्यासाठी एकवटलेल्या ग्रामस्थांमध्ये माजी सरपंच सुनील पाटील, दिलीप पाटील, कुलदीप पाटील, महेश पाटील, प्रदीप दारावकर, गणेश पाटील आदींचा समावेश होता.


जमिनी गेलेले शेतकरी
ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी मनिषा भातिजाने घेतल्या आहेत त्यामध्ये रमेश चांगो पाटील, महेश अनंता पाटील, प्रकाश पाटील, बाळाराम जाधव, हरीचंद्र जाधव, रघुनाथ पाटील, राजेश पाटील, आत्माराम पाटील, पांडुरंग पाटील, राहुल गोंधळी, प्रदिप दारवकर,अशोक पाटील, बाळकृष्ण पाटील, निखिल भोईर, दिलीप मंगल पाटिल,मारुती निघुकर आदींचा समावेश आहे. या सर्वांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांकडे लेखी तक्रार दाखल केली होती.

Exit mobile version