उरणच्या कचर्‍याला घोट ग्रामस्थांचा विरोध

शेकापचा संघर्ष करण्याचा इशारा
पनवेल । वार्ताहर ।
अगोदरच पनवेलच्या कचर्‍यामुळे राहणे नकासे झालेल्या घोट ग्रामस्थांना आता उरणच्या कचर्‍याचा दर्पही सहन करावा लागणार आहे. त्यामुळे घोट ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. प्रसंगी रस्त्यावर संघर्ष करण्याचा इशारा भारतीय शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे. उरण येथील कचरा पनवेल तालुक्यातील घोट गावालगतच्या सिडकोच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात विघटन करण्यात येणार असल्याने ग्रामस्थ एकवटले आहेत.
या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची क्षमता पुढील काही वर्षांत संपणार आहे. पनवेल पालिकेने इतर ठिकाणी स्वत:च्या कचर्‍याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करावे असा हट्ट सिडकोने धरला आहे. पनवेल पालिकेला हा प्रकल्प उभारण्यासाठी अद्याप जमीन मिळालेली नाही. पनवेलकरांचा कचरा प्रत्येक सिडको वसाहतींमध्ये व्यवस्थापन करावा असेसुद्धा नियोजन सिडकोने केले होते. मात्र या नियोजनाला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. त्या दरम्यान पनवेल नगर परिषदेचा विस्तार महापालिकेत झाल्याने सिडको वसाहतींचा कचरा व्यवस्थापन हा प्रश्‍न सूटू शकला नाही. पनवेल तालुक्यातील गावांसाठी शासनाने सिडकोच्या नैना प्राधिकरणाला नियोजन प्राधिकरणाचे अधिकार दिले आहेत. मात्र येथील कचरा उचलला जात नाही. येथील ग्रामपंचायतींना कचर्‍याचे नियोजन करावे लागत आहे. अनेक गावांत कचरा जाळणे हाच सोपा मार्ग निवडला जात आहे. पनवेल शहर व तुलुक्यातील कचरा प्रश्‍न कायम असताना नव्याने घोट येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात उरणचा कचरा आणणार असल्याने घोट गावकर्‍यांनी विरोध केला आहे.
कोट
आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून कचर्‍यामुळे होणार्‍या प्रदूषणाला सामोरे जात आहोत. सिडकोचे अधिकारी सांगतात प्रकल्पातून कोणताही दर्प येत नाही. आम्ही त्यांना आमच्यासोबत गावात एकरात्र राहण्याची विनंती केली आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून आमच्या भावना पनवेल व उरणच्या प्रशासनाने समजावून घ्यावी. प्रत्येक शहरातील व गावातील ग्रामस्थांनी त्यांचा कचरा त्यांच्या गावाशेजारी व्यवस्थापन केल्यास आमच्या गावावरील भार कमी होईल.

Exit mobile version