नववर्षानिमित्त सौर दिव्यांची भेट

| पाली | वार्ताहर |

परिज्ञान परिवार संस्थेतर्फे किल्ले रायगड परिसरातील दुर्गम खेड्यात जाऊन तेथील शेतकरी वर्गातील जेष्ठ नागरिकांना नुकतेच सौर उर्जेवर चालणार्‍या दिव्यांचे वाटप करण्यात आले.

अजय नाडकर्णी यांची 6 वर्षाची कन्या अनन्या नाडकर्णी हिच्या हस्ते सौर उर्जेवर चालणार्‍या दिव्यांचे वाटप करण्यात आले. मुंबई येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. उदय अंदार यांच्या परिज्ञान परिवार संस्थेतर्फे संस्थेचे स्वयंसेवक अजय नाडकर्णी व तेजस जानस्कर यांच्या प्रयत्नातून माणगाव तालुक्यातील वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांच्या मार्फत गेली 3 वर्षे किल्ले रायगड व महाड, माणगाव व म्हसळा परिसरात सौर दिव्यांचे वाटप केले जात आहे.

शंतनु कुवेसकर यांच्यासमवेत पक्षी निरीक्षण व निसर्ग भ्रमंती करत असताना अजय नाडकर्णी आणि त्यांची कन्या अनन्या हिच्या मनामध्ये रायगड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मावळ्यांचे सर्व वंशज राहत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावे असा विचार आला. त्यातूनच गेली दोन वर्षे या परिसरात शक्य असेल तितक्या क्षमतेने सदर उपक्रम राबविण्यात येत आहेत.

सौरदिवे भेट मिळाल्याने दुर्गम ग्रामीण भागातील जेष्ठ शेतकरी ग्रामस्थांचे चेहरे समाधानाने उजळले. परिज्ञान परिवार संस्था 2007 साली लोणावळ्यामधील कार्ला येथील स्वामी परिज्ञानाश्रम यांच्या स्मरणार्थ लोकसेवेसाठी स्थापन करण्यात आली असून संस्थेमार्फत अनेकांना वैद्यकीय मदत देखील पुरवली जाते, संस्थेमार्फत लोणावळ्यात दहिवली, कार्ला येथे परिज्ञान छाया वृद्धाश्रम देखील स्थापित करण्यात आले असून वृद्धाश्रमात सध्या 12 रहिवासी आहेत.

Exit mobile version