गिल सचिन, सेहवागच्या रांगेत

| कोलंबो | वृत्तसंस्था |

श्रीलंका विरुद्ध भारत संघात कोलंबोमध्ये कसोटी मालिकेतील दुसरा सामना रविवारपासून सुरू आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी भारताकडून पहिल्याच दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत शुभमन गिल आणि देवदत्त पडिक्कल या दोघांनीही अर्धशतके केली. त्यासोबतच गिलने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात भारतासाठी यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या सलामीवीरांना चांगली सुरुवात केली होती. परंतु, केएल राहुलला 11 व्या षटकात लहिरू कुमाराने 18 धावांवर बाद केले, त्यानंतर यशस्वी जैस्वाल 17 व्या षटकात माघारी परतला. त्याला 53 चेंडूत 45 धावांवर असताना असिथा फर्नांडोने त्रिफळाचीत केले. पहिल्या सत्रातच दोन्ही सलामीवीरांना गमावल्यानंतर भारताचा डाव देवदत्त पडिक्कल आणि शुभमन गिल यांनी सांभाळला. या दोघांनी एकमेकांची चांगली साथ देत जवळपास दुसरे पूर्ण सत्र खेळून काढले होते. त्यांनी अर्धशतकही केली. परंतु, टी ब्रेक होण्याआधीच्या शेवटच्या षटकात गिलला असिथा फर्नांडोने निरोशान डिकवेल्लाच्या हातून झेलबाद केले. गिलने 108 चेंडूत 50 धावांची खेळी केली. पडिक्कल मात्र त्याच्या लयीत खेळत होता. टी ब्रेक झाला तेव्हा भारताने 3 बाद 187 धावा केल्या होत्या. दरम्यान, गिलने हे अर्धशतक करताना कसोटी कारकिर्दीत 3000 धावांचा टप्पा पार केला आहे. गिलने 77 डावांत जवळपास 43 च्या सरासरीने 11 शतके आणि 9 अर्धशतकांसह 3000 धावा पूर्ण केल्या. असे करणारा तो 28 वा भारतीय खेळाडू ठरला आहे. या यादीत गिलच्या पुढे सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि दिलीप वेंगसरकर आहेत.तसेच, सर्वात कमी वयात 3000 धावा करणारा चौथ्या क्रमांकाचा भारतीय ठरला आहे. त्यामुळे गिलने कपिल देव यांना या यादीत मागे टाकले आहे.

Exit mobile version