प्रेमसंबंध नाकारल्याने भिवंडीत तरुणीची निघृण हत्या

। भिवंडी । प्रतिनिधी ।

प्रेमसंबंधास नकार दिल्याने भाजी कापण्याच्या चाकूने तरुणाने तरुणीची निघृण हत्या केली आहे. भिवंडी तालुक्यातील भादवड गावात ही घटना घडली असून हल्ल्यावेळी मोठ्या बहिणीला वाचवताना लहान बहीण गंभीर जखमी झाली आहे.मूळची उत्तर प्रदेशातील भदोई जिल्ह्यातील ग्राम नेवादा (दुरस्ता) येथे राहणारी नीतू सिंग (23) कुटुंबासोबत भादवड गावातील कृष्णानगरमधील भरत तरे यांच्या चाळीतील एका भाड्याच्या खोलीत राहत होती. तर, आरोपी राजू सिंग (24) हा देखील त्याच चाळीत राहत आहे. राजू सिंगचे नीतूवर एकतर्फी प्रेम होते; पण त्याचे प्रेम नाकारल्याच्या रागातून सोमवारी सकाळी (दि. 28) सव्वाअकराच्या सुमारास घरात एकटी असलेल्या नीतूवर राजूने भाजी कापण्याच्या सुर्‍याने वार केले. या हल्ल्यात नीतूचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तर, बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात तिची लहान बहीण रितू गंभीर जखमी आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर, फरारी राजू सिंगचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू आहे.

Exit mobile version