| मुंबई | प्रतिनिधी |
आई – वडिलांनी मोबाईलमध्ये गेम खेळण्यास विरोध केल्याने 14 वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. गोरेगावमधील आरे कॉलनी परिसरात ही घटना घडली. लक्ष्मी यादव असे या मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी आरे पोलिसांनी अपमृत्यूचा गुन्हा नोंद केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव (पूर्व) येथील आरे कॉलनी परिसरात वास्तव्यास असलेल्या लक्ष्मी यादवला मोबाइलवर गेम खेळायची खूप आवड होती. तासंतास ती मोबाईलवर गेम खेळत असायची. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून ती मोबाईलवर खेळत रहायची. त्यामुळे तिचे पालक सतत तिला ओरडत होते. लक्ष्मी सोमवारी दुपारी बराच वेळ मोबाईलवर गेम खेळत होती. त्यामुळे पालकांनी तिचा मोबाईल काढून घेतला. यामुळे लक्ष्मी संतापली. रागाच्या भरात ती दुपारी चार च्या सुमारास आतील खोलीत गेली आणि आतून दरवाजाला कडी लावून घेतली. खोलीतील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून तिने आत्महत्या केली. तिला उपचारासाठी जोगेश्वरीच्या ट्रॉमा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मोबाईल काढून घेतल्याने मुलीने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचा जबाब तिच्या पालकांनी दिली. त्यावरून आरे पोलिसांनी अपमृत्यूचा गुन्हा नोंद केला आहे.