| पनवेल | वार्ताहर |
दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांनी तीन स्कुटीवरून रस्ता अडवून जाणाऱ्या सहा तरुणांना हॉर्न वाजवून बाजूला होण्यास सांगितले. त्या वेळी संतप्त झालेल्या सहा तरुणांनी दुचाकीवरील दोन्ही व्यक्तींना बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.7) रात्री पनवेलमध्ये घडली. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणांचा शोध घेऊन त्यापैकी चार आरोपींना रविवारी अटक केली, तर त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना नोटीस बजावली आहे. तक्रारदार दीपक मोहिते (46) हे पनवेलच्या साई नगरमध्ये राहण्यास आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ते रणधीरकुमार सिंग (36) या मित्रासह आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. त्या वेळी सहा तरुण तीन स्कुटीवरून संपूर्ण रस्ता अडवून, गप्पा मारत जात असल्याने दीपक मोहिते यांनी हॉर्न वाजवून त्यांना रस्ता सोडण्यास सांगितले. या गोष्टीचा स्कुटीवरील तरुणांना राग आल्याने त्यांनी मोहिते यांना अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर त्या सर्वांनी दीपक मोहिते व रणधीरकुमार या दोघांना भररस्त्यात लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत दोघे जखमी झाल्यानंतर सर्व तरुण पळून गेले. या मारहाणीत रणधीरकुमार सिंग हे गंभीर जखमी झाले असून, या दोघांनी रुग्णालयात उपचार घेऊन पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. नवशाद पटेल (27), सनाल रासलकर (19९), अरमान शेख (19) व रिहान बागवान (18) या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर यातील चार तरुणांना मारहाणीच्या गुन्ह्यात अटक केली. या चारही तरुणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, दोन अल्पवयीन मुलांना नोटीस देऊन त्यांची सुटका करण्यात आली आहे.