| पनवेल | वार्ताहर |
कौटूंबिक वादातून पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची घटना खारघर येथील सेक्टर-34 मधील डॉल्फीन प्राईड सोसायटीत घडली आहे. नोतन ऊर्फ संजय सचदेव या पतीने आपली पत्नी सपना नोतन दास हिचा खून करून स्वतः आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य मूळचे पाकिस्तानचे नागरिक असून, सहा महिन्यांपूर्वी ते पर्यटन व्हिसावर भारतात आले होते. त्यांच्यात सतत घरगुती वाद होत असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. सकाळी त्यांची 10 आणि 6 वर्षांची दोन्ही मुले शाळेत गेल्यानंतर नोतन सचदेवने स्वयंपाकघरातील चाकूने पत्नी सपनावर वार करून तिची हत्या केली. पत्नीचा खून केल्यानंतर त्याने स्वतः देखील आत्महत्या केली. मुले शाळेतून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.