| खोपोली | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील कारगावच्या जंगल परिसरात एका आठ वर्षीय बालिकेवर वन्य पशुने हल्ला करुन तिला ठार मारण्याची घटना उघडकीस आली आहे. आराध्य सोपान मुसळे असे या बालिकेचे नाव आहे.
कारगांव गावाच्या मागील मैदानावर कोयना पुनर्वसन क्रिकेट सामने शुक्रवार ते रविवारी पर्यंत सुरू होते. याठिकाणी आराध्या सोपान मुसळे हिच्या वडीलांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. दुपारी वडिलांना पिण्याच्या पाण्याची बाटली आणि काही सामान घेऊन क्रिकेट सामने ठिकाणी गेली होती. परंतु आराध्या वडिलांकडे पोहचलीच नाही. सायंकाळी 5 वाजता वडील घरी पोहचल्यावर सर्वत्र शोधाशोध केल्यावर जंगलात आराध्याचा मृतदेह आढळून आला .
घटनेची माहिती मिळताच खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, खालापूर पोलिस निरीक्षक बाळा कुंभार, वनविभागाचे अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. यावेळी तिचा मृतदेह आढळून आला.
हत्येची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनीही तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी आराध्याचे तोंड फाटले होते. तिच्या हातापायावर प्राण्याच्या नखांच्या खुणा तसेच तिच्या नखांमध्ये प्राण्याचं केस आढळल्याने जंगलातील हिसंक प्राण्याने हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. रात्री उशीरा खालापूर प्राथमिक रूग्णालयात मृतदेह आणल्यावर सकाळी पुढील तपासाच्या दृष्टिकोनाातून जेजे रूग्णालयात हालविण्यात आहे. सोमवारी सकाळापासून क्राईम ब्रँचचे पोलिस अधिकारी, वनविभागाचे अधिकारी तपास करीत होते.