| पनवेल | वार्ताहर |
अल्पवयीन असलेल्या प्रेयसीने प्रेमसंबंध तोडल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून त्यावरून तिच्यासोबतचे आक्षेपार्ह व अश्लील फोटो व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. अनुराग मोरे (22) असे या तरुणाचे नाव असून, खांदेश्वर पोलिसांनी त्याच्याविरोधात विनयभंगासह पॉक्सो तसेच आयटी अॅक्ट व बदनामीकारक माहिती प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील आरोपी अनुराग मोरे हा सोलापूर येथे राहण्यास आहे, तर 17 वर्षीय पीडित मुलगी नवीन पनवेल भागात राहण्यास असून, सध्या ती शिक्षण घेत आहे. आरोपी अनुराग हा पूर्वी नवीन पनवेलमध्ये राहण्यास होता. त्यावेळी त्याने पीडित मुलीसोबत मैत्री करून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले होते. मात्र, अनुराग हा पीडित मुलीवर नेहमी संशय घेऊन तिला मारहाण करत होता. त्याच्या या विक्षित वागण्यामुळे पीडित मुलीने त्याच्यासोबत संपर्क तोडला होता. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या अनुरागने पीडित मुलीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केले. त्यानंतर त्याने पीडित मुलीसोबतचे अश्लील व आक्षेपार्ह फोटो तसेच मेसेज व्हायरल केले. अनुराग इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित मुलीसोबतचे फोटो पीडित मुलीचे काका व वडिलांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवून तिची बदनामी केली. या प्रकारानंतर पीडित मुलीने आपल्या आईवडिलांसह खांदेश्वर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अनुगार मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या सोलापूर येथे असल्याने अद्याप त्याला अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.