सारडे विस्तारीत गावठाणास मंजुरी द्या

ग्रामस्थांचे तहसीलदारांना मागणीचे निवेदन

| उरण | वार्ताहर |

मागील अनेक वर्षे विस्तारीत गावठाणांचा प्रश्‍न मार्गी लागला नसल्यामुळे अनेक गावांमध्ये गावठाण विस्तार झाला नाही. परिणामी, अनेक गावात गरजेपोटी बांधलेली घरांना अद्याप अधिकृत मान्यता मिळत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी केलेल्या 1932 च्या सर्व्हेनंतर गेली 91 वर्षांत मूळ गावठाणाभोवती नैसर्गिक लोकसंख्या वाढीपोटी वाढलेल्या विस्तारीत गावठाणांचा, घरांचा, सार्वजनिक वास्तू, रस्ते, शाळा, मंदिरे यांचा कोणताही नकाशा प्रशासनाने बनविला नसल्यामुळे गावा-गावात जमिनी आणि घरे बांधण्यास अडचणी येतात. त्यामुळे सारडे ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणी व लोकसहभागातून विस्तारीत गावठाणाचे सीमांकन केले आहे. या सीमांकनाला शासनाने मंजुरी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी उरणचे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांच्याकडे दिलेल्या निवेदन पत्रकाद्वारे केली आहे.

सारडे गावचे मूळ गावठाण 9 एकर असून, विस्तारीत गावठाण हे 97 एकर आहे. गावाची लोकसंख्या 1 हजार 800 आहे व घरांची संख्या 671 एवढी आहे. उरण तालुक्यात शासनाकडून सेझ, नैना, खोपटा नवे शहर, एमआयडीसी सारख्या प्रकल्पांसाठी जमिनींच्या भूसंपादनासाठी वेळोवेळी नोटीफिकेश जारी करण्यात आले आहे. त्यातच नैना, खोपटे नवे शहर, एमएमआरड़ीए सारख्या संस्थांना प्लनिंग अ‍ॅथोरीटी नेमण्यात येत असल्याने गरजेपोटी केलेल्या बांधकामाबाबत कोणत्याही नियमांची स्पष्टता होत नाही. त्यामुळे सारडे गावाचे संवैधानिक हक्क अबाधित रहावे म्हणून ग्रामस्थानी केलेल्या सिमांकनाला शासनाने मान्यता द्यावी अशी मागणी उरणचे तहसिलदार उद्धव कदम यांच्याकडे सारडे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामस्थांच्या शिष्ट मंडळाने केली आहे.

Exit mobile version