| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमध्ये आगामी काळात ई-रिक्षा सुरू होणार असल्याने इथल्या पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर व्यवसाय प्राप्त होऊन निश्चितच येथील कायापालट होणार आहे. जवळपास 94 हातरिक्षा चालकांना या ई-रिक्षा मिळणार आहे. परंतु, काही कारणाने पनवाने काढायचे राहूने गेलेल्या घोडेवाल्यांनाही ई-रिक्षाचा परवाना मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.
याठिकाणी गुण्यागोविंदाने नांदत असणाऱ्या स्थानिक घोडेवाल्यांना अर्थातच जे इथे पिढ्यान् पिढ्या वास्तव्यास असून, ज्यांच्याकडे घोड्यांचा परवाना मागील काही वर्षांपासून नाही. ज्यावेळी घोड्यांची पासिंग झाली होती, त्यावेळी जे घोडेवाले काही कारणास्तव परवाना घेण्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु, आजही ते आपला व्यवसाय करून कुटुंबाला आर्थिक आधार देत आहेत.
अशांना ई-रिक्षाचा लाभ मिळाल्यास त्यांनाही एकप्रकारे व्यावसायिकदृष्ट्या आधार प्राप्त होऊ शकतो. ज्यांना आपल्या घोड्यांचा परवाना स्वेच्छेने शासनाकडे जमा करून ई-रिक्षाचा व्यवसाय सुरू करावयाचा असेल, अशा स्थानिक घोडेवाल्यांबाबतीत शासनाने साधकबाधक विचार केल्यास एकप्रकारे त्यांच्या कुटुंबाला व्यवसायाचे साधन यानिमित्ताने मिळू शकते, असे विनापरवाना घोडेवाल्यांकडून बोलले जात आहे.